जागर नारीशक्तीचा – ‘ती’चे विधी कवच’ अभियानातून महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती नवरात्रीत १०,८०० विधी सेवा माहितीपत्रकांचे वितरण; १,६१२ विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि. 21 : महिला व मुलींना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे, अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्यास प्रोत्साहित करणे आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘जागर नारीशक्तीचा – ‘ती’चे विधी कवच’ या विशेष जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत नऊ शाळांमधील एकूण १,६१२ विद्यार्थिनींना कायदेविषयक मार्गदर्शनासह स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. तसेच, रूपाभवानी मंदिर परिसरात १० हजार ८०० विधी सेवा माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.
न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांच्या संकल्पनेतून आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून महिला व मुलींना कायदेशीर हक्क, कायद्याचे संरक्षण आणि उपलब्ध विधी सेवा यांची माहिती देण्यात आली.
नवरात्रोत्सवानिमित्त रूपाभवानी मंदिर परिसरात वितरित करण्यात आलेल्या माहितीपत्रकांमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा (नालसा) टोल फ्री क्रमांक १५१००, लोकअदालत, पोक्सो कायदा, बेटी बचाव, वैकल्पिक वाद निवारण, बालकांचे विधी कवच, मध्यस्थी प्रक्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार आदी विषयांचा समावेश होता. या उपक्रमाद्वारे नागरिकांना मोफत विधी सेवा, कायदेशीर हक्क तसेच न्याय मिळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची माहिती देण्यात आली.
महिला व बालकांच्या हक्कांसाठी विशेष जनजागृती
महिला व बालकांना कायद्याचे संरक्षण, मोफत विधी सहाय्य आणि तक्रार निवारणासाठी उपलब्ध यंत्रणांची माहिती मिळावी, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे बळ मिळावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्यायव्यवस्थेची मदत पोहोचावी, या उद्देशाने अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. या अभियानात दयानंद विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विधी स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग नोंदविला. अभियान यशस्वी करण्यासाठी विधी स्वयंसेवक, पॅरा लीगल व्हॉलंटिअर्स (PLV) तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




