महालक्ष्मीच्या आरासीत अवतरले ईश्वरीय ज्ञानविश्व; मांजरे परिवाराची ज्ञानमय आरास बार्शीकरांचे आकर्षण

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महालक्ष्मी सणानिमित्त घराघरांत विविध प्रकारच्या आकर्षक आरास उभारल्या जात असताना, धर्माधिकारी प्लॉट येथील मांजरे परिवाराच्या घरी साकारलेली आगळीवेगळी आरास सध्या बार्शीकरांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. महालक्ष्मीच्या पारंपरिक आरासीत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्राचे ज्ञानमय स्वरूप साकारून ईश्वरीय ज्ञान, राजयोग आणि आत्मजागृतीचा संदेश देण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक ब्रह्माकुमार विलासभाई मांजरे व जयश्री मांजरे हे गेली २५ वर्षे ब्रह्माकुमारी संस्थेचे नियमित विद्यार्थी आहेत. त्यांच्या निवासस्थानी ही विशेष आरास त्यांच्या स्नुषा सुजाता राहुल मांजरे यांच्या कल्पक संकल्पनेतून आणि मेहनतीतून साकारण्यात आली आहे.

आरासीत ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रातील दैनंदिन आध्यात्मिक वातावरणाचे जिवंत चित्रण करण्यात आले आहे. राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी दीदी ईश्वरीय ज्ञानमुरलीचे वाचन करत असून, अनेक गृहस्थ दांपत्ये, मातृशक्ती, बंधू, कुमार आणि कुमारी मुरली श्रवणासाठी उपस्थित असल्याचे दृश्य मूर्त स्वरूपात उभे करण्यात आले आहे. ज्ञानमुरलीवरील ईश्वरीय महावाक्येही भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.500याशिवाय लक्ष्मी-नारायणाचे चित्र, माऊंट आबू येथील ब्रह्माबाबांची ऐतिहासिक झोपडी, शांतिस्तंभ तसेच राजयोग अभ्यासक्रमातील आत्म्याची ओळख, शिव परमात्मा, ८४ जन्मांचे चक्र यांसारख्या विषयांची सचित्र माहितीही सजावटीत प्रदर्शित करण्यात आली आहे.

रांगोळीच्या माध्यमातून विघ्नहर्ता श्री गणेशाची प्रतिमा, निराकार ज्योतिर्बिंदू आणि ‘ॐ शांती’ महामंत्र साकारण्यात आला असून, संपूर्ण आरास अध्यात्म, संस्कृती आणि ज्ञानाचा सुंदर संगम घडवित आहे.

महालक्ष्मीच्या पारंपरिक आरासीतून समाजापर्यंत ईश्वरीय ज्ञानाचा संदेश पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न असून, धर्माधिकारी प्लॉट येथील मांजरे परिवाराची ही ज्ञानमय आरास पाहण्यासाठी बार्शीकरांनी मोठी गर्दी केली आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या