सोलापूर महापालिका हद्दीतील पथविक्रेत्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा – समीर मुलानी

0

मानाचा आजोबा गणपती येथून लोकसंवाद- 2026 या उपक्रमाचा शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वनिधी (PM SVANidhi) योजनेच्या माध्यमातून शहरातील पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. पात्र पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे पीएम स्वनिधी योजनेचे समन्वयक समीर मुलानी यांनी केले आहे.

माहिती जनसंपर्क विभाग अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने लोकसंवाद 2026 उपक्रम जिल्ह्यात राबवण्यास सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने उपक्रमाचा शुभारंभ सोलापूर शहरातील सर्वात जुना व मानाचा आजोबा गणपती सार्वजनिक गणेश मंडळ येथे करण्यात आला, याप्रसंगी श्री मुलानी मार्गदर्शन करत होते. यावेळी मंडळाचे खजिनदार केदार वनारोटे, सहसचिव गंगाधर गवसने, विश्वस्त सदस्य जगदीश किनीकर, विश्वस्त सातलिंगप्पा शेट्टी, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.

मुलानी पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी टप्प्याटप्प्याने कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. पहिल्या टप्प्यात ₹15 हजारांपर्यंत, दुसऱ्या टप्प्यात ₹25 हजारांपर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यात ₹50 हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील टप्प्यातील कर्जासाठी पात्रता मिळते. तसेच ₹30 हजारांपर्यंत यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध आहे. तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पथविक्रेत्यांनी यूपीआयचा वापर करावा. यामुळे व्यवसायातील व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.500योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र पथविक्रेत्यांकडे आधारकार्ड, रहिवासी व पथविक्रेता संबंधित कागदपत्रे, बँक पासबुक, पॅनकार्ड आदी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पात्र पथविक्रेत्यांनी www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. तसेच सीएससी/एपीएमसी केंद्रांमार्फतही अर्ज करता येणार आहे.

शहरातील पात्र पथविक्रेत्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या व्यवसायाला आर्थिक बळ द्यावे, असे आवाहन समन्वयक समीर मुलानी यांनी केले आहे. तसेच प्रधानमंत्री घरकुल योजना शहरी आणि एकल महिला विषयीच्या योजनेची माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी माहिती व जनसंपर्क विभागाने दिनांक 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत सुरू केलेल्या लोकसंवाद 2026 या उपक्रमाविषयी माहिती दिली.आजोबा गणपती सार्वजनिक गणेश मंडळाचे खजिनदार वनारोटे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली तसेच विविध शासकीय उपक्रमांना सदैव सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मिलिंद भिंगारे यांनी केले. या कार्यक्रमास गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या