ॲक्टिव्ह युथ सेल्फ-हेल्प ग्रुपचा सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा; ॲक्ट. राहुल शेंडगे ठरले मानाच्या ‘ॲक्टिव्ह युथ पुरस्कारा’चे मानकरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील ॲक्टिव्ह युथ सेल्फ-हेल्प ग्रुपचा सहावा वर्धापन दिन सोहळा 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश चंद्रकांत कारंजकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर बबन मोरे आणि एनडीआरएफ (NDRF) चे जवान पांडुरंग वसंत नलवडे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ॲक्ट. सागर बिडकर यांनी गेल्या सहा वर्षांतील ग्रुपच्या वाटचालीचा आणि कार्याचा सविस्तर आढावा वाचून दाखवला. यावेळी त्यांनी भविष्यातील योजनांची दिशा स्पष्ट करत, ग्रुपतर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सभासद विमा’ योजनेची महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.
पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा सन्मान
सामाजिक बांधिलकी जपत ज्या सभासदांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला होता, अशा सर्व दात्यांचा याप्रसंगी विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच, अल्पबचत योजनेत सातत्य राखणाऱ्या सभासदांना प्रोत्साहनपर भेटवस्तूंचे वाटपही करण्यात आले.
पुरस्कार वितरण
ग्रुपच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या सभासदांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावर्षीचा मानाचा ‘ॲक्टिव्ह युथ पुरस्कार’ राहुल लक्ष्मण शेंडगे यांना प्रदान करण्यात आला. तर वैभव लिंबराज क्षीरसागर आणि अविनाश रामेश्वर वैद्य यांना ‘उत्कृष्ट सभासद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
अध्यक्षीय मनोगतातून योगेश कारंजकर यांनी ग्रुपच्या एकजुटीचे आणि अल्पावधीत घेतलेल्या गगनभरारीचे भरभरून कौतुक केले. प्रमुख पाहुणे किशोर मोरे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करत सर्व पदाधिकारी आणि सभासदांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एनडीआरएफचे जवान पांडुरंग नलवडे (मेजर) यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रुपच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली व “हा ग्रुप खऱ्या अर्थाने यशस्वी आणि जबाबदार युवा घडवण्याचे काम करत आहे,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन संजय मसुते सर यांनी केले व त्यांनीही ओघवत्या शैलीत ग्रुपच्या योजनांची माहिती उपस्थितांपर्यंत पोहोचवली. कार्यक्रमाच्या शेवटी अविनाश शिलवंत यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थित सभासदांचे आभार मानले.




