एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती १ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : एसटी प्रवासादरम्यान शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्य शासनामार्फत अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवासाची, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलतीची सुविधा देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, राज्यभरातील अनेक पात्र प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली, तरी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती १ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पात्र प्रवाशांनी या कालावधीत आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.





