बार्शी तालुका पोलिसांची एकाच दिवसात दुहेरी कारवाई; ८ आरोपींवर गुन्हे, ₹३.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा अवैध धंदे करणाऱ्यांना दणका
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. २२ : बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबवत एकाच दिवसात अवैध जुगार आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ₹३ लाख ६८ हजार ३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अवैध क्लबमध्ये पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण केला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र. २२९/२०२६ मध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये जुगार खेळणाऱ्या सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये जावेद दिलावर शेख, सिद्धेश्वर पांडुरंग आगलावे, संभाजी हनुमंत आगलावे, शंकर विलास ननवरे, धनाजी साहेबराव आगलावे, गणेश चंद्रकांत आगलावे आणि भाऊ जगन्नाथ आगलावे (सर्व रा. बावी, ता. बार्शी) यांचा समावेश आहे.
तसेच गुन्हा रजिस्टर क्र. २३०/२०२६ मध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये चंद्रकांत बलभीम पिंगळे (रा. बार्शी) याच्याविरुद्ध अवैध दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सदाशिव गवळी, अमित घाडगे, सोमनाथ खांडेकर, अमृत खेडकर, संदीप निचळ, सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड, शिवशंकर खराडे, सागर वाकळे, अश्विनी साबळे आणि प्रीती आगलावे यांनी सहभाग घेतला.




