दुष्काळग्रस्तांना माणुसकीचा आधार; पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शेतकरी कुटुंबांसोबत साजरी केली दिवाळी

शिवगड तांडा येथे शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन साधला आपुलकीचा संवाद
B1न्यूज मराठी नेटवर्क
दुष्काळग्रस्त कुटुंबांना कपडे, मिठाई, फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिवगड तांडा येथे शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबांना कपडे, मिठाई, फराळ व भेटवस्तू देऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. तसेच दुष्काळग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार यंदा गावागावांत जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार दुष्काळग्रस्त नागरिकांना दिवाळीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पालकमंत्री शिरसाट यांनी आज शिवगड तांडा येथे दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.
यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी शेतकरी रंगनाथ नाना नवगिरे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. नवगिरे यांच्या कुटुंबीयांना कपडे, फराळ व मिठाई देऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या भेटीतून शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश देण्यात आला. दिवाळी हा केवळ आनंद आणि उत्साहाचा सण नसून गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचाही सण आहे. याच भावनेतून दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळात या कुटुंबांना दिलासा देण्याबरोबरच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
संकट कितीही मोठे असले तरी सामान्य नागरिकांना एकटे न सोडता त्यांच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे साथ देणे हीच खरी माणुसकी आहे. प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचावा आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.
शेतकरी आणि सामान्य नागरिक हे शासनाच्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत. दुष्काळासारख्या आपत्तीच्या काळात शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास शेतकरी कुटुंबांना देणे महत्त्वाचे आहे. शासन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत संवेदनशील असून त्यांना आवश्यक तो आधार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.
याशिवाय पालकमंत्री शिरसाट यांनी वडगाव कोल्हाटी, प्रति पंढरपूर आणि सातारा परिसरातही दुष्काळग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप केले. यावेळी स्थानिक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.




