पणत्या घरात, माणुसकी मनात! मित्र विद्यालयाच्या शिक्षकांनी २७ विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन साजरी केली मायेची दिवाळी

१३ गावांतील पालकत्व हरवलेल्या विद्यार्थ्यांची घेतली आस्थेने विचारपूस; फराळ व मिठाई देत फुलविले चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर हास्य
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपुलकीचा सण! मात्र, आई-वडील अथवा आजी-आजोबांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांसाठी सणासुदीचे दिवस अनेकदा एकटेपणाची जाणीव करून देणारे ठरतात. अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविण्यासाठी श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित कर्मवीर ना.मा. गडसिंग गुरुजी मित्र विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा अनोखा दीप प्रज्वलित केला.
विद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पालकत्व हरवलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक विलास मिरगणे, प्राचार्य विकास बोराडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांना दिवाळीचा फराळ व मिठाई देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न केला.
कर्मवीर गडसिंग गुरुजी यांनी दिलेली शिकवण आणि आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत मळेगाव, तांदुळवाडी, महागाव, बावी, हिंगणी, पिंपरी, चिखर्डे, गोरमाळे, नारी, नारीवाडी, सावरगाव, जामगाव आणि इंदापूर या गावांतील एकूण २७ विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांनी भेटी दिल्या.
केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञान देणे एवढेच शिक्षकांचे कर्तव्य नसून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अडचणीच्या काळात त्यांना आधार देणे आणि त्यांच्यात आत्मीयतेची भावना निर्माण करणे हीदेखील शिक्षकांची सामाजिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
दिवाळीच्या काळात घराघरांत पणत्या उजळतात; मात्र अशा उपक्रमांतून माणुसकीच्या पणत्या मनामनांत उजळतात. मित्र विद्यालयातील शिक्षकांनी कृतीतून जपलेली ही संवेदनशीलता शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.शिक्षक केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मायेचा, आधाराचा आणि माणुसकीचा प्रकाशही निर्माण करतात, याची प्रचिती या उपक्रमातून आली.







