बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 50 हून अधिक CCTV फुटेज तपासून 230 किमी दूर पुण्यातून अपघातातील आरोपीला जेरबंद

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. 20 : बार्शी तालुका पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावत धडाकेबाज कामगिरी केली आहे. तब्बल 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि सहा टोलनाक्यांची तपासणी करून अपघातानंतर 230 किलोमीटर दूर पुण्यात जाऊन लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 227/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281 व 106(1) अंतर्गत अज्ञात वाहनाच्या धडकेत राजाभाऊ प्रभाकर शिंदे (वय 48, रा. कामखेडा, ता. रेणापूर, जि. लातूर) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघातानंतर आरोपी वाहनासह पसार झाल्याने तपासास मोठे आव्हान निर्माण झाले होते.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अपघात पथकासह तपासाची सूत्रे हाती घेतली.
अपघातस्थळापासून चारही दिशेतील मार्गांवरील 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि सहा टोलनाक्यांवरील नोंदी तपासल्यानंतर अपघातातील वाहन MH-12-XH-3198 क्रमांकाची वॅगनआर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपी पुण्यातील कोंढवा परिसरात असल्याची माहिती मिळवली.
तपासादरम्यान आरोपी धर्मा बाबा जाधव याने अपघातानंतर वाहन पुण्यातील कात्रज येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवले असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या गॅरेजवर सापळा रचून कौशल्यपूर्ण कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
अवघ्या तीन दिवसांत शेकडो किलोमीटरचा पाठपुरावा, 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अज्ञात आरोपी व वाहनाचा शोध घेतल्याने बार्शी तालुका पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरुळे, हनुमंत काळे, अतुल बाकले, युवराज गायकवाड, शिवशंकर खराडे आणि सागर वाकळे यांनी पार पाडली.




