दिल्लीत आमदार राजाभाऊ राऊत यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट; टेंभुर्णी–बार्शी–लातूर मार्गाच्या चौपदरीकरणाला गती मिळण्याची शक्यता
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन टेंभुर्णी–कुर्डूवाडी–बार्शी–कुसळंब (राष्ट्रीय महामार्ग क्र. 548C) तसेच कुसळंब–येडशी–मुरुड–लातूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. 63) या महत्त्वाच्या मार्गांच्या चौपदरीकरणासाठी डीपीआरला मान्यता देऊन तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची मागणी केली.
यावेळी आमदार राजाभाऊ राऊत यांनी टेंभुर्णी–कुर्डूवाडी–बार्शी–कुसळंब राष्ट्रीय महामार्ग क्र. 548C (कि.मी. 157/350 ते 230/176) तसेच कुसळंब–येडशी–मुरुड–लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 (कि.मी. 0+550 ते 20+460) या मार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून कामास गती देण्याची विनंती केली. हा प्रकल्प सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीनेही तो लाभदायक ठरणार असल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 548C आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 हे महाराष्ट्रातील विविध प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे महत्त्वाचे दुवे असल्याने या मार्गांचे चौपदरीकरण झाल्यास वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार आहे. बार्शी तालुक्यासह सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांची या प्रकल्पाबाबत अनेक वर्षांपासूनची मागणी असून ती तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.
या भेटीवेळी आमदार राणाजगजितसिंह दादा पाटील तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देत, या रस्ते प्रकल्पाला लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन आमदार राजाभाऊ राऊत यांना दिले. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाला लवकरच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





