पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय प्रतिवर्षी ५ लाख वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ

0

शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क500

कोल्हापूर, दि. १३ : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज आजरा तालुक्यातील मौजे मसोली येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर वृक्षलागवडीला व्यापक आणि शाश्वत स्वरूप देण्यात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिवर्षी ५ लाख वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार पुढील २१ वर्षांत टप्प्याटप्प्याने तब्बल १ कोटी ५ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.500संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आज ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला. वृक्षलागवड ही केवळ उद्दिष्टपूर्तीपुरती मर्यादित न राहता लावलेले प्रत्येक रोप जगावे, त्याची योग्य जोपासना व्हावी आणि जिल्ह्याचे हरित क्षेत्र वाढावे, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी केले. राज्यात यंदा १८ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी-सार्वजनिक सहभाग, ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन आणि विविध विभागांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. लागवड केलेल्या रोपांच्या वाढीचे आणि स्थितीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग करण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन आणि जीआयएस प्रणालीचाही वापर करण्यात येणार आहे.500कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेसाठी आवश्यक सर्व रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायती, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धनाचीही जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मसोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शुभारंभाने कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापक आणि दीर्घकालीन हरित मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी हरीश सुळ, तहसीलदार समीर माने, सरपंच चंद्रकांत गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.0005

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या