बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नियुक्ती
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बार्शी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याबरोबरच अवैध धंदे, गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अधिक आक्रमक आणि प्रभावी कारवाया होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अक्षय सोनवणे हे कर्तव्यदक्ष, धाडसी आणि परिणामकारक कारवायांसाठी जिल्हा व राज्यस्तरावर ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील वसई, विरारसारख्या महत्वाच्या ठाण्यांमध्ये कार्यरत राहून सुमारे १० वर्षे सेवा बजावली. सातारा जिल्ह्यात फलटण ग्रामीण, दहिवडी, म्हसवड आदी ठाण्यांमध्ये काम केले.
जनतेशी समन्वय साधून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या त्यांच्या कार्यशैलीची पोलिस दलात विशेष दखल घेतली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे गुन्हे उघडकीस आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील नागरिकांना आता अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.





