उद्घाटनचंद्रपूरमहाराष्ट्र

‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क

चंद्रपूर, दि. 20 : जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने ‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापूर येथे उत्साहात पार पडला. सिकलसेल रुग्ण सीमा चानुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दुर्गापूरचे उपसरपंच प्रज्योत पुणेकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

ही विशेष मोहीम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, मोहिमेंतर्गत सिकलसेल तपासणी, निदान, मोफत उपचार, समुपदेशन व व्यापक जनजागृतीवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली.

सिकलसेल हा आजार पूर्णपणे बरा होणारा नसला तरी वेळेवर निदान व नियमित उपचारांमुळे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. ‘अरुणोदय’ अभियानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन तालुका आरोग्य सहाय्यक सुरेश कुंभारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावरील सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेश्वर, सुभाष सोरते तसेच प्रा. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button