बार्शी तालुक्यात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात…जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अवघ्या दोन दिवसांत 331 अर्जांची विक्री – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. निवडणूक प्रक्रियेतील पहिला टप्पा असलेल्या उमेदवारी अर्ज विक्रीला नागरिकांचा आणि इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी एकूण 217 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी 93 अर्ज, पंचायत समिती गणासाठी 124 अर्ज विकले गेले. त्यानंतर 19 जानेवारी 2026 अखेरपर्यंत अर्ज विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून एकूण 331 अर्जांची विक्री झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी 124 अर्ज, पंचायत समिती गणासाठी 207 अर्ज विकले गेले आहेत.
दरम्यान, उमेदवारी दाखल अर्जांची संख्या अद्याप निरंक असल्याची माहिती देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून सध्या अर्जांची खरेदी सुरू असून प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करण्याकडे लवकरच कल वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही संपूर्ण माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा बार्शी तहसीलदार मा. एफ. आर. शेख यांनी अधिकृतरित्या दिली आहे. अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात अर्ज विक्री झाल्याने बार्शी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत असून, पुढील काही दिवसांत राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





