सोलापूर सोशल असोसिएशनच्या आर्टस व कॉमर्स कॉलेजच्या इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उत्साहात उद्घाटन

साहित्य हे मानवी मूल्यांची जपणूक करणारे प्रभावी माध्यम आहे : डॉ. राहुल पालके
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर सोशल असोसिएशनच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर येथील इंग्रजी विभागाच्या वतीने इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन २९ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमासाठी श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल भगवान पालके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जे. तांबोळी होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी इंग्रजी साहित्याच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता, सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगितले. वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आस्मा खान, विभागप्रमुख, इंग्रजी विभाग यांनी केले. त्यांनी इंग्रजी वाङ्मय मंडळाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारे साहित्यिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध संधींची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे डॉ. राहुल पालके यांनी आपल्या मार्गदर्शनात ब्रिटिश, भारतीय आणि अमेरिकन साहित्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी मानवतेची जपणूक करणे ही साहित्याची मूलगामी भूमिका असल्याचे सांगितले. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला दिशा देणारे आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “मानवता धर्म जोपासणे ही साहित्याची भूमिका असली पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
साहित्याच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, चिकित्सक विचारशक्ती, सामाजिक जाणीव आणि व्यापक जीवनदृष्टी विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच विविध साहित्यप्रकारांचे नियमित वाचन करावे आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. पालके यांनी केले.
यावेळी डॉ. राहुल पालके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इंग्रजी विभागाच्या वतीने त्यांना कृतज्ञतापत्र प्रदान करण्यात आले. प्राचार्य डॉ. जे. जे. तांबोळी यांनी डॉ. पालके यांच्या उपस्थितीबद्दल व प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले. इंग्रजी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्यवाचन, चिंतन, सर्जनशील लेखन आणि प्रभावी अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला यामुळे निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




