डिजिटल मीडियातील ६२ पत्रकारांना १९ लाखांची मदत; प्रतिबिंब प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय स्तुत्य उपक्रम!

जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते धनादेश वितरण; अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चंद्रकांत दादा पाटील पत्रकार पाल्य शिष्यवृत्ती योजना’ची यशस्वी अंमलबजावणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
सातारा : डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील गरजू पत्रकारांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘नामदार चंद्रकांत दादा पाटील पत्रकार पाल्य शिष्यवृत्ती योजने’तून राज्यातील तब्बल ६२ पत्रकारांना एकूण १९ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. पत्रकारांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चासह कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी ही मदत देण्यात आली आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केले.
सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे आज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते लाभार्थी पत्रकारांना मदतीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करताना अनेक पत्रकार आर्थिक मर्यादांशी सामना करतात. विशेषतः पाल्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क आणि कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च पेलताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
अशा गरजू पत्रकारांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्याचे काम या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. राज्यातील ६२ पत्रकारांपर्यंत १९ लाख रुपयांची मदत पोहोचविणे ही केवळ आर्थिक मदतीची बाब नसून डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबिंब प्रतिष्ठान महाराष्ट्रने राबविलेला हा उपक्रम पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.
या कार्यक्रमास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, राज्य महासचिव विकास भोसले, साप्ताहिक संघटना प्रदेशाध्यक्ष संजय कदम, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, राज्य संघटक सचिन भिलारे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, पश्चिम महाराष्ट्र सचिव लिंगराज साखरे, कोरेगाव तालुकाध्यक्ष संदीप पवार, वाई तालुकाध्यक्ष बापू वाघ, सातारा शहराध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप माने, कराड तालुका उपाध्यक्ष सागर गिरी, कराड तालुका सचिव सागर दंडवते, विनोद चंदनशिवे, विकास वाघमारे, बबन चव्हाण, राहुल इंगोले, धनराज भोसले, इरफान शेख, वाई तालुका कार्यकारिणी सदस्य विकास जाधव, तानाजी बोडरे तसेच सातारा जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्य संगीता शिराळे यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.




