हिंगोलीच्या औद्योगिक विकासाला नवी गती ; एक हजार 235 कोटींचे गुंतवणूक करार – उद्योगमंत्री उदय सामंत

100 कोटीच्या हळदीवर प्रक्रीया करणारा उद्योग क्लस्टरच्या रुपाने उभा करण्यावर भर
B1न्यूज मराठी नेटवर्क
कळमनुरी तालुक्यातील वारंगा व कामठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांना मंजुरी
101 उद्योजकांसोबत गुंतवणूक करार सात हजाराहून अधिक रोजगार उपलब्ध
हिंगोली : राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी गावोगावी उद्योजक निर्माण करण्यावर शासन भर देणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 101 उद्योजकांसोबत एक हजार 235 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीतून सुमारे सात हजार 711 स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यात 100 कोटीच्या हळदीवर प्रक्रीया करणारा उद्योग क्लस्टरच्या रुपाने उभा करण्यावर भर देण्यात येणार आहे. कळमनुरी तालुक्यातील वारंगा व कामठा येथे दोन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांना (एमआयडीसी) मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
हिंगोली येथील शांती हॉटेल, अकोला रोड येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग व सेवा विभागाचे सहआयुक्त स्वप्नील राठोड, मैत्री मुंबईच्या नोडल अधिकारी प्रियदर्शनी सोनार, एमआयडीसीचे मुख्य अभियंता श्री.बनसोड, सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) अनिल कदम, डाकघर अधीक्षक,विभागीय कार्यालय परभणीचे डॉ.संजय लिये यांच्यासह सुमारे 300 उद्योजक उपस्थित होते.
यावेळी कै. खासदार रामराव वडकुते यांना श्रध्दांजली अर्पण करुन त्यांनी जिल्ह्यासाठी केलेले संकल्प आपण सगळे मिळून पूर्ण करु असे उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
राज्यात उद्योग उभारणी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. दावोस येथे दरवर्षी मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करार केले जातात. त्याच धर्तीवर जिल्हास्तरावर गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे. हिंगोली जिल्ह्यात आज झालेल्या 101 गुंतवणूक करारांतून सात हजार पेक्षा जास्त रोजगारनिर्मिती अपेक्षित असून, गाव तेथे उद्योजक तयार करण्यासाठी शासन-प्रशासन संयुक्तपणे प्रयत्न करणार असल्याचे उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी जमीन, पाणी व अन्य आवश्यक संसाधनांची उपलब्धता असल्याने औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण आहे. कळमनुरी तालुक्यातील वारंगा आणि मौजे कामठा येथे एमआयडीसी उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादन, प्रक्रिया व मूल्यवर्धनाला चालना मिळणार आहे. परिसरातील तीन जिल्ह्यांमधून सुमारे 25 लाख टन हळदीचे उत्पादन होत असल्याने त्यामुळे भविष्यात 100 कोटीचा हळदीवर प्रक्रीया करणारा फार मोठा उद्योग क्लस्टरच्या रुपाने उभारु शकतो, असेही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात नवीन उद्योग उभारणी झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ व मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध होतील, तसेच त्यांच्या मुलांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळेल. जिल्ह्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी लवकरच कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हिंगोलीतील उद्योजकांना उद्योगविषयक कामांसाठी मुंबई येथे जाण्याची आवश्यकता भासल्यास त्यांना प्रोत्साहन व सहकार्य करण्यात येईल. शासन उद्योजकांच्या पाठीशी असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याने 138 टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक केले.
हिंगोली जिल्ह्याची हळदीच्या माध्यमातून जागतिक ओळख – आमदार हेमंत पाटील
हिंगोली जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी आवश्यक जमीन, पाणी व अन्य संसाधने उपलब्ध आहेत. जिल्ह्यात मोठे उद्योग उभारल्यास स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळून विकासाला गती मिळेल. जिल्ह्यात टाटा स्किल सेंटर उभारल्यास कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल, असे आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
वसमत येथील हळद संशोधन केंद्रातून हळदीच्या विविध उत्पादनांवर संशोधन सुरू असून, हळदीपासून शुद्ध कुंकू तयार करण्यासह सुमारे 150 उत्पादनांवर काम करण्यात येत आहे. या संशोधन केंद्राला शासनाने अधिक बळ देण्याची गरज आहे. केंद्राला एक जीआय मानांकन मिळाले असून, दुसरे मानांकनही लवकर मिळण्याची अपेक्षा आहे. हिंगोली जिल्हा हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, त्याची हळदीचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी दरमहा बैठक
हिंगोली जिल्ह्यात तीन एमआयडीसी असून, देशातील हळद उत्पादनात जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, एक हजार कोटी रुपयांचे उत्पादन होत आहे. जिल्ह्यात आणखी मोठे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या माध्यमातून नवउद्योजक उभारणीवर भर देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी दरमहा बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय नीलावार यांनी केले. आभार उद्योग अधिकारी रवींद्र पत्की यांनी मानले.




