प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

केसरी रेशन कार्डधारकांना पुढील तीन महिने प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत अन्नधान्य; आधार सीडिंग तातडीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

टंचाईच्या पार्श्वभूमीवर ९० कोटी ६७ लाखांचा कृती आराखडा; आज रोजी २८० टँकरने पाणीपुरवठा सुरू तसेच टँकरची मागणी आल्यास ४८ तासांत मंजुरी देण्याचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क350

सोलापूर : जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि जलस्रोतांचे नियोजन प्राधान्याने करावे. केसरी रेशन कार्डधारकांना शासन निर्णयानुसार पुढील तीन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात यावे. यासाठी उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सीडिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात टंचाईच्या अनुषंगाने आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभवेंद्र खांडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक लांडगे, भूजल विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक मुस्ताक शेख, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. राठोड, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका अशीच लोकरे, सहाय्यक नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

केसरी कार्डधारकांना मोफत अन्नधान्य-
जिल्ह्यात 0३ लाख २५ हजार केसरी रेशन कार्डधारक असून, त्यापैकी सुमारे ४० टक्के लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित ६० टक्के लाभार्थ्यांनी तातडीने आधार सीडिंग करून घ्यावे. यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी गावपातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत सुमारे १६ लाख ५० हजार लाभार्थ्यांना दरमहा मोफत अन्नधान्य वितरित केले जाते. त्याचप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार टंचाईची परिस्थिती अनुषंगाने केसरी रेशन कार्डधारकांनाही पुढील तीन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ८५३ गावे आणि २५५ वाड्यांसाठी एकूण ४ हजार ४४८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यासाठी ९० कोटी ६७ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील २१६ गावांमध्ये २८० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर सुरू करण्याची मागणी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत मागणी प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत टँकरला मंजुरी मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जानेवारी ते जून २०२७ या सहा महिन्यांच्या कालावधीतील पाणीटंचाई कृती आराखडा १५ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून शासनाकडे सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

जलजीवन मिशनअंतर्गत ७५ ते ९९ टक्के कामे पूर्ण झालेल्या योजनांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे ४८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करावी. या योजना पूर्ण झाल्यानंतर टँकरची संख्या किती प्रमाणात कमी होऊ शकते, याची माहितीही सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

चारा उपलब्धतेसाठी पाच कोटींचे नियोजन
जिल्ह्यातील चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाला पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी दोन कोटी रुपयांतून चारा निर्मिती करण्यात आली असून, तीन कोटी रुपयांच्या निधीतून बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामधून आगामी काळात तीन लाख ७६ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे.

तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिशन मुरघास योजना जिल्ह्यातील ६३ गावांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पशुपालकांची निवड करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.

उजनी धरणासह जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी उपलब्ध राहील, या दृष्टीने पाणीवापराचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

याशिवाय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समिती मधून विविध विभागांना दुष्काळी उपाय योजना साठी देण्यात येणाऱ्य निधी, पीक कर्ज पुनर्गठन, पीक कर्ज वाटप, कर्जमाफी, पीक विमा, पीक कापणी प्रयोग, शेततळ्यांचे पंचनामे आदी विषयांचाही जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button