कासारवाडीत २९ नोव्हेंबरपासून श्री सद्गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी उत्सव श्रीमद् भागवत कथा, श्री ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; ६ डिसेंबरला महाप्रसादाने सोहळ्याची सांगता

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील कासारवाडी येथील सच्चिदानंद श्री सद्गुरू सीताराम महाराज मंदिरात श्री सद्गुरू सीताराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार, दि. २९ नोव्हेंबर ते रविवार, दि. ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा आणि श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
या सप्ताहात अमरावती येथील ह.भ.प. भागवताचार्य श्री. हरिओम महाराज निंभोरकर (शास्त्री) यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होणार आहे. सप्ताहकाळात हरिपाठ, भजन, कीर्तन, पारायण, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे. तसेच परिसरातील विविध महिला भजनी मंडळे या सोहळ्यात सहभागी होऊन भक्तिरसाची रंगत वाढविणार आहेत.
शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री सद्गुरू सीताराम महाराज मंदिरापासून दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवार, दि. ६ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता श्री सद्गुरू सीताराम महाराजांचा समाधी उत्सव संपन्न होईल. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. कीर्तनकेसरी सतीश महाराज कदम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
दुपारी १२ वाजता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी उत्सव तसेच काला व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून, यानंतर आठवडाभर चाललेल्या धार्मिक सोहळ्याची सांगता होईल. या उत्सवाच्या निमित्ताने कासारवाडी परिसरात भक्ती, अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा जागर होणार आहे. तरी कासारवाडी तसेच परिसरातील सर्व भाविकांनी सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सद्गुरू सीताराम महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




