नवी दिल्लीपुरस्कारमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राचा गौरव; विशेष पुरस्काराने सन्मान, भागीदार राज्य म्हणून प्रभावी सहभागाची दखल; महाराष्ट्र शासन आणि लघुउद्योग विकास महामंडळाचा गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क350

नवी दिल्ली, दि. २८ : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा २०२६ मध्ये भागीदार राज्य म्हणून उत्कृष्ट सहभाग नोंदविल्याबद्दल महाराष्ट्राला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाला भारत सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गत भारतीय व्यापार प्रोत्साहन संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत मंडपम येथे झालेल्या समारंभात महामंडळाच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्ली येथे १४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजित ४५ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राने भागीदार राज्य म्हणून सहभाग घेतला होता. ‘विकास आणि वारसा’ ही यंदाच्या मेळ्याची संकल्पना होती. महाराष्ट्राने ६४ प्रदर्शन दालनांच्या माध्यमातून राज्याची औद्योगिक प्रगती, उद्योजकीय क्षमता, पारंपरिक हस्तकला, सांस्कृतिक वैभव आणि स्थानिक उत्पादनांचे प्रभावी प्रदर्शन केले.350महाराष्ट्र दालनात विविध जिल्ह्यांतील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, हातमाग उत्पादने, पारंपरिक हस्तकला आणि लघुउद्योगांच्या उत्पादनांना स्थान देण्यात आले होते. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या उपक्रमांतर्गत निवडक उत्पादनांचेही प्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे राज्यातील उद्योजक, कारागीर आणि स्थानिक उत्पादकांना आपल्या उत्पादनांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्धी मिळवून देण्याची संधी उपलब्ध झाली.

उद्योग, गुंतवणूक व सेवा तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यात आले होते. मेळ्याच्या कालावधीत महाराष्ट्राच्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button