बार्शी शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या १०६ वाहनांवर धडक कारवाई; ७९ हजारांचा दंड वसूल

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी बार्शी शहर पोलिसांकडून विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ७९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी शहरातील प्रमुख ठिकाणी विशेष वाहतूक मोहीम राबविली. बार्शी शहर बस स्थानक, कुर्डवाडी रोड, शिवाजी कॉलेज परिसर तसेच मुख्य बाजारपेठेतील पांडे चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान अनधिकृत पार्किंग करणारी वाहने, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अनधिकृत बोर्ड तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. MV Act अंतर्गत एकूण १०६ वाहनांवर कारवाई करून ७९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील वाहतूक शिस्त कायम राहावी, नागरिकांना वाहतुकीस अडथळ्याविना सुरक्षितपणे ये-जा करता यावी तसेच अपघातांना आळा बसावा, या उद्देशाने अशा प्रकारच्या विशेष वाहतूक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत, असे आवाहन बार्शी पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.




