एलनिनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाण्याचा सुयोग्य वापर करावा – जिल्हाधिकारी वान्मथी सी

गट पिक प्रात्यक्षिक क्षेत्रावर ‘शेती दिन’ कार्यक्रमाचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा, दि.12 : एलनिनोच्या प्रभावामुळे शेती करीता पाण्याचा सुयोग्य वापर करणे अतिशय आवश्यक आहे. बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी शेतीसोबत आधुनिक शेती पध्दती तसेच कृषि आधारीत पुरक व्यवसाय देखील करावा. शेतकऱ्यांनी पिक विमा काढून आपली पिके संरक्षित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, सेलसुराच्यावतीने सेवा संकल्प अभियान दरम्यान आर्वी तालुक्यातील खरांगना येथील प्रगतीशील शेतकरी शिरीष महल्ले यांच्या शेतावर ‘पीडीकेव्ही अंबा’ या सोयाबीनच्या सुधारित वाणाच्या गट पिक प्रात्यक्षिक क्षेत्रावर ‘शेती दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, तालुका कृषि अधिकारी रवींद्र उघाडे, मंडळ कृषि अधिकारी विजय खोंडे उपस्थित होते.
यावेळी वान्मथी सी यांनी शेतकरी व महिला शेतकरी यांच्यासोबत खरीप हंगामातील पिक परिस्थिती व येणाऱ्या रब्बी हंगामातील पिक नियोजन विषयी सखोल चर्चा केली.
शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिडीकेव्ही अंबा हे सुधारित वाण प्रात्यक्षिकाच्या स्वरुपात बघितल्याने शाश्वती मिळते. हे वाण कीड व रोगांना बळी पडणारे नसून अधिक उत्पन्न देणारे वाण आहे. कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण विषयी अरविंद उपरीकर यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. जीवन कतोरे यांनी सोयाबीनचे पिडीकेव्ही अंबा या वाणाचे वैशिष्ठे विषद केले तसेच शेती दिनाचा उद्देश सांगितला. एलनिनोच्या परिस्थिती नुसार सोयबीन पिडीकेव्ही अंबा वाण हे इतर वाणांच्या तुलनेत बदलत्या वातावरणात टिकून राहते यावर भर देत सोयाबीन, तूर व कपाशी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, रुंद सरी वरंबा पद्धतीचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. भारती तिजारे यांनी सोयबीन – पिडीकेव्ही अंबा वाणाचे शेतकऱ्यांच्या शेतावर गट पिक प्रात्याक्षिके यशस्वीपणे राबविले. पिक सरंक्षण विषयतज्ञ डॉ. निलेश वझिरे यांनी ट्रायकोडर्माचा वापर या विषयी सांगितले. पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी विविध प्रकारचे चारा लागवड व त्याचा दुग्ध जनावरांना होणारा फायदा व एलनिनो दरम्यान जनावरांकरिता करावयाच्या उपयोजनाबाबत माहिती दिली. कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. सविता पवार यांनी रुंद वरंबा व सरी पद्धतीचा अवलंब केल्यास होणारे फायदे विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता कृषि विभागातील एम. वाय. नेले, एस.एन. काळपांडे, रुपेश चौधरी, ढगे, मनीष लीडबे, नीलिमा अक्कलवार, गजेंद्र मानकर, गणेश वायरे, वैभव चौधरी व ग्रामस्थांनी योगदान दिले, असे कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.




