पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

मराठी अध्यापन व साहित्य सेवा पुरस्कारासाठी डॉ. मनिषा झोंबाडे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्यगौरव पुरस्कारासाठी (सन-२०२५) यंदा बार्शी च्या डॉ. मनीषा जगन्नाथ झोंबाडे यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यात टाकळीभान येथे होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. मनीषा जगन्नाथ झोंबाडे ह्या लातूरच्या शिवाजी महाविद्यालय मुरुड येथे सहाय्यक प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. एक उत्तम प्रशासक तसेच अभ्यासू, हुशार व विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका, उत्कृष्ट व्याख्याता असा त्यांचा नावलौकिक आहे. बार्शीच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व श्रीमान भाऊसाहेब झाडबुके या शिक्षण सम्राटांच्या वैचारिकतेचा वारसा जोपासत आपले अध्यापनाचे कार्य त्या अगदी निष्ठेने व प्रामाणिकपणे करीत आहेत. पोलिस खात्यात असणाऱ्या आपल्या वडीलांच्या शिस्तीमुळे व संस्कारामुळे लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची सवय आहे.

सातत्याने वाचन व लेखन या त्यांच्या सवयींमुळे त्यांना मराठी भाषेविषयी गोडी निर्माण झाली. महाविद्यालयीन अध्यापना सोबतच विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त असणाऱ्या पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले आहे. विशेषतः अण्णा भाऊ साठे यांचे ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन त्यांनी इंग्रजीत “My Journey of Rassia” या नावाने इंग्रजीत भाषांतरीत केले आहे.

त्याचबरोबर प्रवासवर्णन साहित्य : संकल्पना स्वरूप व व्याप्ती (समीक्षा ग्रंथ), अण्णा भाऊ साठे समग्र साहित्य : एक चिंतन ( संपादित), ‘ऋणानुबंधाच्या जुळल्या इथून गाठी’ ( प्रवासवर्णन), मराठी प्रवासवर्णन : समाज संस्कृती दर्शन (समीक्षा ग्रंथ), यशवंतराव चव्हाण लिखित विदेशी दर्शन : एक दृष्टिक्षेप (समीक्षा ग्रंथ) इत्यादी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. विविध वर्तमानपत्रे, नियतकलिके व मासिकांमधून सातत्याने लेखन कार्य सुरु आहे. अनेक राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये निबंध वाचक म्हणून त्यांचा नेहमी सहभाग असतो.

विशेष म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन व साहित्यिक कार्य या विषयाच्या अनुषंगाने त्यांचे तब्ब्ल 40 आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित आहेत. मराठवाडा व विदर्भामध्ये शैक्षणिक व सामाजिक विषयावर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. मराठी भाषेवर असणारे त्यांचे प्रेम त्यांनी आपल्या अध्यापन कृतीतून व साहित्य लेखनातून व्यक्त करून मराठी भाषेचा गौरव केला आहे. मराठी विषयाचे उत्कृष्ट अध्यापन कार्य व साहित्य सेवा केल्याबद्दल
त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

त्याबद्दल त्यांचे रुरल एज्युकेशन सोसायटी मुरुडचे अध्यक्ष अमरभैया मोरे, सचिव ऍड. विजय पाटील, अनिलदादा माने तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक धनंजय शिंदे, प्रा. प्रकाश शिंगणापूरे, प्रा. अविनाश नरसिंगे, प्रा. प्रकाश गवले, लातूरचे प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, प्राचार्य डॉ. महेश बेटकर,प्राचार्य डॉ. अशोक काळम प्रा. डॉ. पुष्पा महाजन, प्रा डॉ. विजय कुमठेकर यांच्यासह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button