मांजरी येथील जिल्हा परिषद शाळेतमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

B1न्यूज मराठी नेटवर्क
लातूर, दि. 16 : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव 2025 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर तालुक्यातील मांजरी येथील यशवंत चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पाटील, सरपंच महादेव ढगे, उपसरपंच भीमा धुमाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बल्लाळनाथ काळे, मुख्याध्यापिका चंदा देशमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पुरी, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना शालेय पाठ्यपुस्तके, गणवेश आणि शूजचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी सजवलेल्या बैलगाडीत बसून शाळेत दाखल झाले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजावेत, यासाठी शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
मांजरी येथील यशवंत चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या शाळेचा लौकिक कायम ठेवण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी सातत्याने प्रयत्न करावेत. मराठीसह इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी केले. गटविकास अधिकारी भालके यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.