अमरावतीमहाराष्ट्र

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

विभागीय लोकशाही दिनात 19 प्रकरणांवर सुनावणी ; पाच प्रकरणे निकाली

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती, दि. 9 : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय चौकशी, पडताळणी करुन सुस्पष्ट अंतीम अहवाल तत्काळ सादर करावा. मागील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनी येवू नये, याची संबंधित विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी संबंधित विभागांना आज येथे दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण 19 प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजू फडके, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी बैठकीला उपस्थित होते.

यावेळी विभागीय लोकशाही दिनात दाखल एकूण 19 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली असून पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर उर्वरित प्रकरणांवर पंधरा दिवसांत आवश्यक कार्यवाही करुन अंतीम अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीमती सिंघल यांनी संबंधित विभाग प्रमुखांना केल्या.

विभागीय लोकशाही दिनासाठी सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 6 स्वीकृत व 13 अस्वीकृत अशा एकूण 19 अर्जांपैकी सविस्तर चर्चेअंती पाच प्रकरणे निकाली काढण्यात आलीत. लोकशाही दिनासाठी अमरावती विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करुन अंतिम अहवाल तत्काळ सादर करण्यात यावा. तक्रार अयोग्य असल्यास खारिज करुन संबंधितांना कळविण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी संबंधितांना केल्या.

मागील लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनात सुनावणीसाठी येवू नये. न्यायप्रविष्ट किंवा अर्धन्यायिक प्रकरणांसंदर्भात तत्काळ अहवाल सादर करण्यात यावा. लोकशाही दिनासाठी दाखल होणाऱ्या तक्रार अर्जांवर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना श्रीमती सिंघल यांनी यावेळी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button