पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू…

B1न्यूज मराठी नेटवर्क
अकलुज : म्हसवड येथील श्री सिद्धनाथाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक अपघातात लहान मुले आणि महिलांसह तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची महिती मिळत आहे.तर 6 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी (ता. पंढरपूर) येथील भाविक म्हसवड येथे श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊ सर्वजण पिकअप वाहनातून आपल्या गावाकडे परतत होते. दुपारच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही भरधाव पिकअप थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल विहिरीत कोसळली. विहिरीत पाणी असल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
घटनास्थळी ग्रामस्थांची धाव, मृतदेहांचा शोध सुरू
अपघाताचा आवाज ऐकताच तांदूळवाडी येथील स्थानिकग्रामस्थाने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. विहिरीतून पिकअप वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मृतदेहांमध्ये निष्पाप लहान मुले आणि महिलांचा समावेश असल्याने घटनास्थळावरील दृश्य अत्यंत हृदयद्रावक असून या भीषण अपघाताची माहिती मिळताच रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




