जापनीज इन्सेफेलाईटीस लसीकरण मोहिमेचा अलिबाग येथे शुभारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अलिबाग : दि.०१ : जापनीज इन्सेफेलाईटीस (जेई) या गंभीर आजारावरील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज अलिबाग येथील नगरपालिका शाळा क्रमांक ६ येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

हा आजार जापनीज इन्सेफेलाईटीस विषाणू आणि संसर्गित डासांद्वारे पसरतो. त्यामुळे बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रायगड, पुणे आणि परभणी जिल्ह्यांमध्ये १ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना १ मार्चपासून लसीकरण दिले जाणार आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी सकपाळ, तसेच सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीम. नंदिनी चव्हाण, परिसेविका श्रीम. उषा वावरे, तालुका आरोग्य सहायक गणेश भोबु आणि शाळा पर्यवेक्षक श्री. शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात माता बाल संगोपन अधिकारी डॉ. बावडेकर यांनी या लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मोहिमेअंतर्गत सुरुवातीला सर्व मुला-मुलींना एकच डोस दिला जाईल. त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत ९ ते १२ महिन्यांच्या बालकांना पहिला डोस आणि १६ ते २४ महिन्यांच्या बालकांना दुसरा डोस दिला जाणार आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी माता बाल संगोपन केंद्र आणि जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या