महाराष्ट्र गट-क संयुक्त मुख्य परीक्षेचे (१२ जुलै रोजी) आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १२ जुलै २०२६ रोजी ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा छत्रपती संभाजीनगरमधील १५ शाळा व महाविद्यालयांच्या केंद्रांवर पार पडणार असून, यासाठी ४,८२४ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.
परीक्षा दोन सत्रांत होणार असून, सकाळचे सत्र सकाळी ११.०० ते १२.०० आणि दुपारचे सत्र दुपारी ०३.०० ते ०४.०० या वेळेत पार पडेल. परीक्षेच्या कामकाजासाठी ५१९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांनी परीक्षेला येताना प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
सुधारित कार्यपद्धतीनुसार, परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी मुख्य प्रवेशद्वार बंद केले जाईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
परीक्षा कक्षामध्ये मोबाइल, ब्लूटुथ, स्मार्टवॉच किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणास सक्त मनाई आहे. असे साहित्य आढळल्यास उमेदवारांवर फौजदारी आणि प्रशासकीय कारवाईसह त्यांना आगामी परीक्षांसाठी बंदी घालण्यात येईल.
उमेदवारांनी परीक्षेसाठी वेळेत म्हणजे सकाळी १० ते १०:३० वाजण्याच्या आत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.




