ऊसदराच्या बैठकीत तोडगा नाहीच! शेतकरी ३५०० रुपयांवर ठाम; कारखानदार ३१५० च्या पुढे जाण्यास तयार नाहीत

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा अद्याप कायम असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे, तर साखर कारखानदार ३१५० रुपयांच्या पुढे दर देण्यास तयार नसल्याने चर्चेतून मार्ग निघू शकला नाही.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित केले होते.
दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत ऊसदरावर चर्चा झाली; मात्र दोन्ही बाजूंच्या भूमिकेत तफावत कायम राहिल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, शेतकरी आणि कारखानदार यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रशासनाने ३२५० रुपये अधिक १०० रुपये असा सुवर्णमध्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, कारखानदार ३१५० रुपयांच्या पुढे जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे कारखानदारांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी यासंदर्भात आदेश काढणार असून, प्रस्तावित दर देण्यास नकार दिल्यास कारखान्यांवर कारवाईचा इशारा दिला जाईल.
मात्र, कारखानदार कारखाने बंद ठेवण्याच्या भूमिकेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कारखाने बंद राहिल्यास शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे गोरे यांनी सांगितले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, संघटना प्रतिटन ३५०० रुपये दराच्या मागणीवर ठाम आहे. कारखानदार ३१५० रुपयांच्या पुढे जाण्यास तयार नसल्याने प्रशासनाने सुचवलेल्या सुवर्णमध्याच्या प्रस्तावानुसार ३२५० रुपये अधिक १०० रुपये असा दर कारखान्यांनी द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.
प्रशासनाने दोन दिवसांची मुदत दिली असली तरी संघटना तीन दिवस थांबण्यास तयार आहे. मात्र, त्यानंतरही कारखाने सुरू झाल्यास ते बंद पाडण्यात येतील. तसेच रेल्वे रोको आंदोलनासह सोलापूर जिल्ह्यातील चारही महामार्ग रोखण्याचा इशाराही रणदिवे यांनी दिला. एकीकडे शेतकरी ३५०० रुपयांच्या मागणीवर ठाम, तर दुसरीकडे कारखानदारांची ३१५० रुपयांपलीकडे जाण्यास नकाराची भूमिका; त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




