बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

दुष्काळाच्या झळांमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याचा आधार!वृक्ष संवर्धन समिती बार्शीचा स्तुत्य उपक्रम

शासकीय आयटीआय परिसरात साकारले सुंदर कृत्रिम पाणवटे

B1न्यूज मराठी नेटवर्क350

बार्शी : एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना माणसांबरोबरच पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता असताना पर्यावरणातील महत्त्वाचे घटक असलेल्या पक्षी, कीटक आणि मधमाशांच्या जीवनाचा विचार करून वृक्ष संवर्धन समिती बार्शीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. पक्ष्यांना उन्हाळ्यात आणि दुष्काळी परिस्थितीत पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी समितीच्या वतीने कृत्रिम पाणवटे तयार करण्यात आले आहेत.350बार्शीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात सिमेंटच्या बशीच्या आकाराचे दोन आकर्षक पाणवटे तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून परिसरातील पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. माणूस आपल्या अन्न-पाण्याची व्यवस्था काही ना काही मार्गाने करू शकतो; मात्र मुके पक्षी, कीटक आणि मधमाशा यांच्यासमोर निर्माण होणारे जीवन-मरणाचे संकट लक्षात घेऊन समितीने हा उपक्रम राबविला आहे.

विशेष म्हणजे, सुमारे दोन वर्षांपूर्वी याच परिसरात वृक्ष संवर्धन समितीच्या पुढाकारातून दुर्मिळ वृक्ष उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानात देशी, दुर्मिळ तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या आणि पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, दररोज सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर प्रसन्न होतो. या परिसरात सुगरण, चिमणी, काळी चिमणी, कोतवाल, सूर्यपक्षी, भारद्वाज, कावळा, चित्तर, वेडा राघू, पाकोळी, मुनिया, टिटवी, साळुंकी, शिंपी, पारवा, पोपट आदी विविध स्थानिक पक्ष्यांचे दर्शन घडते. वृक्षराजीमुळे निर्माण झालेले नैसर्गिक अधिवास आणि आता उपलब्ध करून दिलेले पाणवटे यामुळे या पक्ष्यांना मोठा आधार मिळणार आहे.350वृक्ष संवर्धन समिती बार्शीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून समितीच्या माध्यमातून बार्शी शहर आणि परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम सातत्याने सुरू आहे. केवळ झाडे लावणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता पर्यावरणातील उपयुक्त जैवविविधता टिकवून ठेवणे हीदेखील काळाची गरज आहे. भविष्यात शासकीय आयटीआय परिसर पक्ष्यांनी गजबजलेला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शहरातील विविध भागांतही अशाच प्रकारचे पाणवटे उभारण्याचा समितीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या काळात माणसांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच मुक्या पक्ष्यांचाही विचार करणारा वृक्ष संवर्धन समितीचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा ठरत आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवले, तर अनेक पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात. निसर्गातील या छोट्या जीवांसाठी केलेली पाण्याची व्यवस्था हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची ओळख आहे.350या उपक्रमासाठी शासकीय आयटीआयचे प्राचार्य प्रदीप हरिदास यांचे विशेष सहकार्य लाभले. पाणवटे तयार करण्यासाठी वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य संतोषकुमार गायकवाड, प्रा. आनंद धुमाळ, राहुल तावरे, मोहम्मद शेख, उमेश नलवडे, राणा देशमुख, सायरा मुल्ला, सुधीर वाघमारे, डॉ. प्रवीण मिरगणे, डॉ. श्रीराम देशमुख, सचिन थोरबोले, डॉ. वासुदेव सावंत, अक्षय घोडके आणि दयानंद रेवडकर यांनी परिश्रम घेतले.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button