दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३१ हजारांची देणगी

कारेगावचे गोविंद अवचार यांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याकडे धनादेश सुपूर्द
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी, दि. १७ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. याच सामाजिक बांधिलकीतून कारेगाव (ता. जि. परभणी) येथील सेवानिवृत्त कर्मचारी गोविंद बाबुराव अवचार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३१ हजार १ रुपयांची मदत दिली आहे. त्यांनी दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे असलेला ३१ हजार १ रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते.
सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जाणिवेतून दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी अवचार यांनी दिलेले हे योगदान कौतुकास्पद असून, समाजातील इतर घटकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, सहकारी संस्था, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी दुष्काळ निवारणासाठी तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सढळ हाताने योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे.




