अवैध धंद्यांना थारा नाही; कायदा मोडणाऱ्यांवर बार्शी तालुका पोलिसांचा कठोर वचक कायम!

सपोनी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज कारवाई; अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्यावर छापा, ₹10,325 चा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. ११ ऑगस्ट २०२६ : बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी तालुका पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई केली. अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या इसमावर छापा टाकून ₹10,325 किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
पोलीस पथक दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी नियमित पेट्रोलिंग करीत असताना, बार्शी-जामगाव रोडवरील हॉटेल अश्विनी शेजारी एक इसम बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.
या कारवाईदरम्यान विजय अर्जुन आवटे (वय ५० वर्षे, रा. जामगाव, ता. बार्शी) हा कोणताही वैध परवाना नसताना देशी-विदेशी मद्याची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण ₹10,325 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सपोनी अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर तसेच पोलीस अमलदार सोमनाथ खांडेकर, सिंधुताई देशमुख, अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, गोविंद बचुटे आणि रोहित बागल यांनी सक्रिय सहभाग घेतला.
बार्शी तालुका पोलीस स्टेशनकडून अवैध दारू विक्री, मटका, जुगार तसेच इतर सर्व प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा गैरकृत्यांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन सपोनी अक्षय सोनवणे यांनी केले आहे.




