पिंपरी (सा.) येथील तुकाई देवी मंदिरातून चांदीचा मुखवटा चोरीला; ग्रामस्थांमध्ये संताप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. ४ ऑगस्ट : बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा.) गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुकाई देवी मंदिरातील चांदीचा मुखवटा आज सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस स्टेशनचे PSI जाधव , भोरे आणि पाटील यांनी तात्काळ मंदिर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंदिराचे पुजारी, गावचे सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, युवक तसेच ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून घटनेची प्राथमिक माहिती घेतली.
मंदिर परिसरातील परिस्थितीची पाहणी करत पोलिसांनी पुढील तपासासाठी आवश्यक माहिती संकलित केली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठी नाराजी असून मुखवटा लवकरात लवकर शोधून काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उद्या पिंपरी (सा.) येथील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन वैराग पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
गावच्या आराध्य देवीच्या मंदिरात झालेल्या या चोरीमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी होत आहे.





