वैराग ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी निधीची मागणी; आमदार राजाभाऊ राऊत यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई, दि. २८ : बार्शी तालुक्यातील वैराग येथे कार्यरत असलेल्या डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर अंतर्गत ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी स्वतंत्र व सुसज्ज इमारत उभारण्यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ यांची भेट घेऊन सविस्तर मागणी मांडली.
या भेटीवेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय व वैद्यकीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ उपस्थित होत्या.
सध्या वैराग येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र हे ग्रामीण रुग्णालयाच्या विद्यमान इमारतीतून कार्यरत आहे. मात्र, स्वतंत्र हॉस्पिटल इमारत, विद्यार्थी वसतिगृह, निवासी डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने तसेच प्रशिक्षणार्थींसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवा आणि वैद्यकीय प्रशिक्षणाच्या कामकाजावर मर्यादा येत असल्याचे आमदार राऊत यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी त्यांनी नवीन सुसज्ज हॉस्पिटल इमारत, विद्यार्थी व निवासी डॉक्टरांसाठी आधुनिक वसतिगृह, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, वीज व इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तसेच या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली.
आमदार राजाभाऊ राऊत यांनी वैराग परिसरातील ग्रामीण भागाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा विकास आणि स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी या प्रकल्पाची तातडीची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. या पाठपुराव्यामुळे वैराग ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





