निवेदनबार्शीमहाराष्ट्र

कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करा; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन – युवासेना ठाकरे गटाचा इशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत घालण्यात आलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात तसेच पीक विम्यातून वगळण्यात आलेले ट्रिगर पुन्हा लागू करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी युवासेना (ठाकरे गट) बार्शीच्या वतीने तहसीलदारांमार्फत राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्य सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेत अनेक अटी व शर्ती घालण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थाने कोरा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.500सन २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या आणि सध्या पुन्हा पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली असून त्यासाठीही उर्वरित संपूर्ण कर्ज फेडण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीतून वगळण्यात आल्याबद्दल युवासेनेने नाराजी व्यक्त केली. चार वेळा नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन बोळवण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

राज्य सरकार ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात कठोर अटींमुळे अत्यल्प शेतकरीच लाभार्थी ठरणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सन २०२५ मधील अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई अनेकांना अद्यापही समाधानकारक मिळालेली नसताना आता कर्जमाफीवरही अटींचे ओझे टाकल्याने शेतकरी अधिक अडचणीत सापडल्याचा आरोप युवासेनेने केला.500याशिवाय पीक कर्जासोबतच शेती अवजारे, सिंचन सुविधा, कुक्कुटपालन, इमूपालन, पॉलिहाऊस यांसाठी घेतलेल्या कर्जांचाही कर्जमाफी योजनेत समावेश करावा. तसेच सोनेतारण आणि मायक्रोफायनान्स कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. पीक विम्यातून वगळण्यात आलेले ट्रिगर पुन्हा लागू करावेत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

सरकारने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवासेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख स्वराज क्षीरसागर, जिल्हा सचिव दीपक तिवाडी, शहर सहसचिव अर्जुन सोनवणे, समन्वयक पांडुरंग घोलप, दीपक चुंगे, अभिषेक मडके, आनंद उकरंडे, राहुल बुरसे, महेंद्र गरड यांच्यासह अनेक युवासैनिक उपस्थित होते.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button