खेळण्याच्या मोहापायी घरातून निघालेली ४ वर्षीय चिमुकली; बार्शी शहर पोलिसांच्या तत्परतेने सुखरूप पालकांच्या ताब्यात!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. १७ जून : बार्शी शहरातील मांगडे चाळ परिसरातील चार वर्षीय रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे ही चिमुकली आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली. याबाबत तिचे वडील बाबासाहेब दगड्डु मांगडे यांनी तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून बार्शी शहर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. परिसरात कसून शोध घेत असताना रुद्राक्षा ही चिमुकली टिळक चौक परिसरात सुखरूप आढळून आली. पोलिसांनी तिला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व तिच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत विचारपूस केली.
यावेळी रुद्राक्षाने खेळणे खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पडल्याचे सांगितले. मुलगी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून पोलिसांनी तिला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केले.
आपली मुलगी सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांनी बार्शी शहर पोलिसांचे मनापासून आभार मानले. सदर कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/७५९ संगप्पा मुळे, पो.कॉ./७४७ राहुल बोंदर आणि पो.कॉ./९४८ संतोष जाधवर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. बार्शी शहर पोलिसांच्या तत्परता, दक्षता आणि संवेदनशीलतेमुळे हरवलेली चिमुकली अल्पावधीतच शोधून काढण्यात यश आले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.




