निवडणूकमहानगरपालिकामहाराष्ट्रसोलापूर

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप संबंधित क्षेत्रीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात हजर न राहिल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेस बाधा निर्माण करणारी असल्याने संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्थिर देखरेख पथकांसह विविध निवडणूक कामांसाठी नेमणूक करण्यात आली असतानाही काही कर्मचाऱ्यांनी आदेश झुगारल्याचे निदर्शनास आले आहे.

निवडणूक कार्यालय व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी सूचना देऊनही संबंधित अधिकारी कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. याबाबत गंभीर दखल घेत, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, क्षेत्रीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अद्याप रुजू न झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळी १० वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत उपस्थित न राहणाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीची कणा असून, त्यामध्ये कोणतीही दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा आदेशांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असा ठाम संदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button