बार्शी तालुक्यात धक्कादायक घटना;आईकडून सहा महिन्याच्या बाळाची हत्या, मुलगी जखमी; आईवर खुनाचा गुन्हा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील पांगरी येथे एका महिलेने स्वतःच्या दोन लहान मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला असून सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांगरी येथील रहिवासी कल्याण किसन जाधव (वय 66) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी ते व त्यांची पत्नी शेतावर गेले असताना घरी त्यांची मोठी सुन आशा निलेश जाधव (वय 28) ही दोन लहान मुलांसह घरी होती. दुपारी सुमारे 3.45 वाजता शेजाऱ्यांकडून फोनद्वारे माहिती मिळाली की, आशा जाधव हिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारली आहे.
त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ सरकारी दवाखाना पांगरी येथे धाव घेतली असता, सहा वर्षांची नात अद्विका हिच्या गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने झालेल्या गंभीर जखमा दिसून आल्या. तिला पुढील उपचारासाठी प्रथम बार्शी व नंतर सोलापूर येथे हलविण्यात आले.
दरम्यान, कुटुंबीय घरी परतल्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सहा महिन्यांचा नातू रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी रक्ताने माखलेली ब्लेड व धारदार कटर सापडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या आरोपानुसार, आशा जाधव हिने अज्ञात कारणावरून आपल्या मुलगी अद्विका हिच्यावर ब्लेड व कटरने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच सहा महिन्यांच्या मुलाच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर स्वतःही बाल्कनीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी कल्याण जाधव यांनी आपल्या सुनेविरुद्ध बार्शी पांगरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पांगरी गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.




