छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान बार्शी तालुक्यात व शहरात मार्च, एप्रिल, मे महिन्यात शिबिराचे आयोजन – तहसीलदार एफ. आर. शेख
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील सर्व नागरिकां करीता, महसूल विभागामार्फत ग्रामीण व नागरी स्तरावरील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच विविध घटकांच्या महसूल विषयक दैनंदिन प्रश्नांचे तात्काळ व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाचा टप्पा क्रमांक १ अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद, नगर पंचायत स्तरावर एक दिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख यांनी दिली आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम व गतिमान करणे हा आहे. नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे व विविध दाखल्यांबाबतच्या अडचणी थेट शिबिरातच निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळासाठी संबंधित मंडळ अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
दि. ७ मार्च २०२६ – पांगरी व आगळगांव मंडळ
दि. १४ मार्च २०२६ – नारी, पानगाव व सुर्डी मंडळ
दि. १० एप्रिल २०२६ – गौडगांव व उपळे दुमाला मंडळ
दि. १७ एप्रिल २०२६ – खांडवी व सौंदरे मंडळ
दि. ०८ मे २०२६ – बार्शी नगरपालिका
दि. १५ मे २०२६ – वैराग नगरपंचायत
शिबिरामध्ये पुढीलप्रमाणे सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे.
अभिलेख दुरुस्ती डेस्कद्वारे कागदपत्रे दुरुस्ती.
लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा –
उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र वितरण
भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे.
नागरी सुविधा पुरविणे (एक खिडकी प्रणालीद्वारे सेवा).
ई-मोजणी सुविधा.
ॲग्रीस्टॅक संबंधित सेवा.
पीएम किसान योजनेविषयी मार्गदर्शन व प्रलंबित बाबींचे निराकरण.
तक्रार निवारण कक्ष.
इतर शासकीय विभागामार्फत विविध योजनांचा लाभ वितरण.
महसूल विभागाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार एफ आर शेख यांनी केले आहे. नागरिकांनी संबंधित तारखेला आपल्या मंडळ, नगर परिषद, नगर पंचायतीच्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत असेही तहसीलदार यांनी आवाहन केले आहे.
महसूल प्रशासन आपल्या सेवेसाठी कटिबद्ध असून, जनतेच्या प्रश्नांचे त्वरित व पारदर्शक निराकरण करण्यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार एफ आर शेख यांनी सांगितले आहे.




