कुसळंब येथे तरुणावर जीवघेणा हल्ला; पिस्टलमधून गोळीबार, गुन्हा दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील कुसळंब येथे एका २४ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करून पिस्टलमधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि. २६) सायंकाळी घडली. या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब नंदकुमार उकिरडे (वय २४, रा. कुसळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे शेती व्यवसाय करत असून पोलीस भरतीची तयारी करत आहेत. घटनेच्या दिवशी त्यांचे आई-वडील उपचारासाठी बार्शी येथे गेले होते, तर भाऊ शेतात गेला होता. सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घरासमोर गोंधळाचा आवाज झाल्याने उकिरडे बाहेर आले असता योगेश भास्कर मोरे (रा. कुसळंब, सध्या रा. पुणे) हा हातात लोखंडी रॉड घेऊन घरात शिरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
“माझ्या पत्नीला मेसेज का करतोस?” असा जाब विचारत मोरे याने उकिरडे यांच्या डाव्या पायावर व हातावर लोखंडी रॉडने वार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्यासोबत आलेल्या एका अनोळखी व्यक्तीनेही मारहाण केल्याचा आरोप आहे. जीव वाचवण्यासाठी उकिरडे पळत सुटले असता घराबाहेर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाजवळील व्यक्तीने पिस्टलमधून त्यांच्या दिशेने दोन वेळा गोळीबार केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान, उकिरडे यांच्या भावालाही पिस्टल दाखवून धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती डायल ११२ वरून पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमी उकिरडे यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे उपचार करण्यात आले.
या प्रकरणी योगेश भास्कर मोरे व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार संबंधित चारचाकी वाहनाचा क्रमांक एमएच १२ व्हीसी ४३९८ असा आहे.पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.





