हिट ॲण्ड रन प्रकरणातील फरार आरोपीस १४ महिन्यानंतर परभणीतून अटक , बार्शी शहर पोलीस ठाणेची कामगिरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील गाडेगाव रोड येथे मॉर्निंग वॉक करत असताना शांतीलाल उतरेश्वर बोराडे यांना भरधाव ट्रॅव्हल्सने धडक देऊन चालकाने कोणालाही काही न सांगता पसार झाल्याची घटना ५ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र. नं. १०४९/२४, कलम १०६(१) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात ट्रॅव्हल्सच्या मालकाला यापूर्वी अटक झाली होती; मात्र चालक रफिक अफजल शेख, रा. रहिम नगर, परभणी हा गेल्या १४ महिन्यांपासून फरार होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बालाजी कुकडे यांनी विशेष पथक नेमले होते. पोसई महेश गळगटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगप्पा मुळे व लखन घाडगे यांनी परभणी येथे गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. गोपनीय बातमीदाराकडून आरोपी परभणीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोसई महेश गळगटे, संगप्पा मुळे व लखन घाडगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




