किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
कासारवाडी येथे एनएसएस शिबिराचा पाचवा दिवस आरोग्यजागृतीने उजळला
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे कासारवाडी येथे सुरू असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा आज पाचवा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण व सामाजिक उपयुक्त उपक्रमांनी संपन्न झाला. आजच्या दिवशी दोन महत्त्वाचे आरोग्यविषयक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम तसेच गावासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर यांचा समावेश होता.
किशोरवयीन मुलींसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. विद्याराणी टिक्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, नियमित व्यायाम, योग्य झोप तसेच मानसिक आरोग्याचे महत्त्व विशद केले. मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी व स्वच्छतेबाबतही त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या दरेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिवानी पवार हिने तर आभार वैष्णवी जाधव हिने मानले.
यानंतर गावासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे यांनी केले. शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. अश्विनी मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. एम. माळी यांनी केले, तर आभार कु. शिवानी पवार हिने मानले.
या आरोग्य शिबिरात एकूण 118 नागरिक व प्राथमिक शाळेतील 73 विद्यार्थी यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन-उंची (BMI) तसेच सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जगदाळे मामा हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा दिली. तपासणीदरम्यान काही नागरिकांमध्ये रक्तदाब व साखरेचे प्रमाण आढळून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी एनएसएस स्वयंसेवकांनी नोंदणी, रुग्ण व्यवस्थापन, शिस्त राखणे, पाणीपुरवठा व इतर व्यवस्था उत्कृष्टरीत्या पार पाडल्या. या उपक्रमांमुळे गावकऱ्यांमध्ये तसेच विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून शिबिराचा पाचवा दिवस अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.




