माईलस्टोन स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ चित्रप्रदर्शन संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
कुर्डूवाडी : माईलस्टोन पब्लिक स्कूल चिंचगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदिप बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या जिजाऊंच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य चित्र प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन केले होते त्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास सर व मा.विकास यादव साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांचे हस्ते पार पडले.
कुर्डूवाडी परिसरातील नावाजलेले माईलस्टोन पब्लिक स्कूल चिंचगाव मध्ये जागतिक दर्जाचे चित्रकार रत्नदीप बारबोले सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे भव्य चित्रप्रदर्शन आयोजित केले होते. या चित्र प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊंच्या जन्मापासून ते शेवटपर्यंतचा जीवनप्रवास,बाल कलाकारांनी आपल्या कुंचल्याने कागदावर चित्रित केलेला आहे. यामधून शिवकालीन गोष्टींचा जिवंतपणा दाखवण्यात आलेला आहे.
यामध्ये त्याकाळचे वैभव, चालीरीती, परंपरा, न्यायदानाच्या पद्धती, कर्तव्य , जिजाऊंचा लढाऊ बाणा या गोष्टींचा चित्रांमध्ये समावेश आहे. चित्र एवढे हुबेहूब रेखाटली होती की ती पहातच रहावी असे वाटत होते. एवढा जिवंतपणा चित्रात दिसत होता. चित्र प्रदर्शनाबरोबर विद्यार्थांनी पारंपरिक लेझीम, काठी फिरवणे असे शिवकालीन खेळ ही सादर केले. निर्मोही सुरवसे हिने जिजाऊंचा पोवाडा गायन करून सर्वांची मने जिंकली, विद्यार्थ्यांची व्याख्याने ही सादर केली.
प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व कलारसिक प्रा. राजेंद्र दास यांनी जिजाऊंच्या इतिहासाला हात घालत मोलाचे मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊंचा इतिहास चित्ररूपाने पहिल्यांदाच रेखाटून त्याचे चित्रप्रदर्शन शाळा लेवलवर पहिल्यांदाच झालं आणि तेही दिमाखदार स्वरूपात.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड आप्पासाहेब जगताप, संचालक ॲड अमोल काळे ,शिवव्याख्याते हर्षल बागल,भाग्यकांता समूहाचे मुरलीधर चव्हाण,महाराष्ट्र परिवहन मंडळाचे निवृत्त अधिकारी सतीशचंद्र थोरात,उपसरपंच दत्तात्रय उबाळे , लोकमत चे पत्रकार लक्ष्मण कांबळे,पत्रकार विनायकराव पाटील,संस्थेच्या सचिवा राणी जाधव, संस्थेचे आधारस्तंभ आप्पासाहेब जाधव सर, प्राचार्य सुरवसे सर, प्राचार्या मुजावर मॅडम, माईलस्टोन चे शिक्षक वृंद परिसरातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





