कै.डॉ.थळपती यांचे सुपुत्र डॉ शुभम थळपती यांचे एम.एस. (जनरल सर्जरी) परीक्षेत यश
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील डॉ शुभम विश्वनाथ थळपती यांनी नुकतीच एम.एस. मास्टर इन जनरल सर्जरी ही पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बार्शी शहरासह वैद्यकीय क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
डॉ शुभम थळपती यांचे प्राथमिक शिक्षण सोजर इंग्लिश स्कूल, बार्शी तसेच संजीवनी पब्लिक स्कूल, पन्हाळा येथे झाले. त्यानंतर त्यांनी अकरावी व बारावीचे शिक्षण मॉडेल स्कूल, सोलापूर येथून पूर्ण केले. गुणवत्तेच्या जोरावर त्यांना वैशंपायन मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे प्रवेश मिळाला असून तेथून त्यांनी एमबीबीएस ही पदवी संपादन केली.
पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी वेदांत इन्स्टिट्यूट, पालघर येथे प्रवेश घेऊन एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली. डॉक्टर शुभम थळपती हे बार्शी नगरपालिकेतील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ थळपती यांचे चिरंजीव असून बार्शी नगरपालिकेचे निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. गोदेपुरे यांचे जावई आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे बार्शीच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक कुशल शल्यचिकित्सक उपलब्ध झाला असून त्यांच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.





