सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक : नॉर्थकोट प्रशाला येथे ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक खिडकी उपलब्ध
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना उमेदवारांना महानगरपालिकेतील विविध ना-हरकत प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे. याबाबत सर्व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी. महापालिकेने दि. 21 डिसेंबर 2025 पासून ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक खिडकी नॉर्थकोट प्रशाला येथे सुरू करण्यात येणार असून दुपारी दोन ते सहा या कालावधीत ना हरकत दाखले वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावावर असलेल्या मालमत्तेसंदर्भात मालमत्ता कराची ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या नावावर गाळा (दुकान) असल्यास त्याबाबत स्वतंत्र ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल. तसेच उमेदवाराच्या मालकीची खुली जागा असल्यास, त्या मिळकतीबाबतही संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.उमेदवार व्यवसाय करीत असल्यास, संबंधित व्यवसाय परवाना (लायसन्स) वैध असल्याबाबतची कागदपत्रे जोडावी लागतील.
याशिवाय, उमेदवार महानगरपालिकेमध्ये मक्तेदार (ठेकेदार) आहे किंवा नाही, याबाबतचा सविस्तर तपशील देणे आवश्यक असून, त्यासंबंधीची माहिती लेखी स्वरूपात सादर करावी लागणार आहे.
या सर्व बाबींविषयी उमेदवारांनी स्वयंघोषणापत्र (Self Declaration) सुद्धा अनिवार्यपणे सादर करावे लागेल. स्वयंघोषणापत्रामध्ये दिलेली माहिती सत्य व अचूक असल्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे.सर्व इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी. सर्व इच्छुक उमेदवारांनी शक्य होईल तितके लवकर आपले अर्ज एक खिडकी येथे सादर करण्यात यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.




