महाराष्ट्रसोलापूर

लोकअदालतीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा, ऑनलाइन दंड भरण्याच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : लोकअदालतीच्या नावाचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर ने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लोकअदालतीमध्ये दंड भरण्यासाठी किंवा प्रकरण निकाली काढण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश अथवा ऑनलाइन पेमेंट लिंक पाठविली जात नसल्याचे विधी सेवा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

लोकअदालती ही परस्पर सामंजस्य, संवाद आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे वाद मिटविण्याची व्यवस्था आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून मोबाईलवरून पैसे जमा करण्याची मागणी केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचा संदेश प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सुनील शिंदे यांनी केले आहे.5000विशेषतः बँक खाते क्रमांक, एटीएम कार्ड तपशील, क्रेडिट कार्ड माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये. अशा माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करु शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

लोकअदालतीच्या नावाने पैसे भरण्याची मागणी करणारा संदेश, फोन कॉल किंवा लिंक प्राप्त झाल्यास संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून खातरजमा करावी. पडताळणी न करता कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असेही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांनी जागरूक राहून अशा फसव्या संदेशाबाबत संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी नागरिकांची सतर्कता हेच सर्वात प्रभावी संरक्षण असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर सचिव सुनील शिंदे यांनी नमूद केले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button