कृषीनांदेडप्रशासनमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये; दुबार पेरणीचे संकट टाळण्याचे कृषी विभागाचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

नांदेड, दि. ८ जून : खरीप हंगाम २०२६ मध्ये संभाव्य ‘अल-निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी त्याचे स्वरूप वादळी वाऱ्यासह अधूनमधून पडणाऱ्या सरींचे असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ जूनपासून जिल्ह्यात सरासरी चार पावसाचे दिवस नोंदविण्यात आले असून, सरासरी २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा ‘अल-निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पावसात मोठा खंड पडू शकतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत, म्हणजे किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

अपुऱ्या पावसाच्या आधारे पेरणी केल्यास बियाण्यांची उगवण बाधित होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाच्या शिफारशी व स्थानिक परिस्थितीनुसारच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.50000शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रत्येक गावातील सहाय्यक कृषी अधिकारी गावनिहाय व्हॉट्सॲप गट आणि इतर संपर्क माध्यमांद्वारे पेरणीबाबत सल्ला देत आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील शेतकरी व्हॉट्सॲप गटांमध्ये सहभागी व्हावे तसेच ‘महाविस्तार’ ॲप डाउनलोड करून कृषीविषयक अद्ययावत माहितीचा लाभ घ्यावा, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता स्वतः तपासून पाहावी. तसेच शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करूनच पेरणी केल्यास पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल, असे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button