उन्नत नाशिक अभियान’च्या १२ व्या टप्प्यात नाशिकमधील १०० खुल्या जागांवर ५ हजार देशी वृक्षांची लागवड; ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत ६५ हजारांहून अधिक वृक्षांचा टप्पा पार

B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक : नाशिक शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सुरू असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून’ मोहिमेचा १२ वा टप्पा आज मोठ्या उत्साहात पार पडला. नाशिक सातपूर परिसरात आज या टप्प्यांतर्गत प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० मधील तब्बल १०० खुल्या जागांवर (ओपन स्पेस) प्रत्येकी ५० याप्रमाणे एकूण ५ हजार देशी वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली.
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी महापौर हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, नगरसेवक दिनकर पाटील, अमोल पाटील, भारती धिवरे, संगिता घोटेकर, कविता लोखंडे, उषा बेडकोळी, अंकिता शिंदे, इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर, समाधान देवरे, विश्वास नांगरे, माजी नगरसेविका लताताई पाटील यांच्यासह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षारोपणाच्या या मोहिमेच्या ११ व्या टप्प्यात सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या (CHME) ऐतिहासिक भोसला मिलिटरी कॉलेजच्या परेड ग्राउंडवर ‘कुंभ युवा संवाद’ व ५ हजार देशी वृक्ष वाटपाचा भव्य सोहळा संपन्न झाला होता. त्या टप्प्यापर्यंत मोहिमेने ६० हजारांचा टप्पा गाठला होता. आज प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० मध्ये झालेल्या ५ हजार वृक्षलागवडीमुळे ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत लावण्यात आलेल्या व वाटप केलेल्या एकूण वृक्षांची संख्या आता ६५,२७५ वर पोहोचली आहे.
आज सातपूर येथील कार्यक्रम प्रसंगी विविध सामाजिक व पर्यावरण संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सक्रिय सहकार्याने प्रभागांमधील विविध उद्याने, लेआऊट्स आणि मोकळ्या भूखंडांवर ही हरित मोहीम राबविण्यात आली. परिसरातील नागरिकांनी या झाडांचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा संकल्प केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला ‘स्वच्छ, सुंदर आणि हरित कुंभनगरी’ बनविण्याच्या दिशेने हे अभियान शहराच्या कानाकोपऱ्यात अविरतपणे पुढे नेले जात आहे.



