महाराष्ट्रसांगली

पोलीस दलातील 16 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून प्रत्येकी 25 हजाराचे बक्षीस

अमली पदार्थ कारवायातील कर्तबगार पोलीस अधिकारी, अंमलदारांना शाबासकी

B1न्यूज मराठी नेटवर्क

सांगली : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेशात जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून काढा, बक्षीस देऊ, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषित केले. त्याचबरोबर अमली पदार्थांना आळा घालण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस विभागातील कर्तबगार अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बक्षीस देण्याचे त्यांनी घोषित केले होते. याच अनुषंगाने आज पोलीस दलातील तब्बल 16 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी रक्कम रूपये 25 हजाराचे म्हणजेच एकूण चार लाख रूपयांचे धनादेश आज स्वतःच्या संवेदना संस्थेच्या निधीतून वितरीत केले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, मिरज उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

विटा येथे जानेवारी महिन्यात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर विषयाचे गांभीर्य ओळखून, तातडीने पावले उचलत अमली पदार्थ तस्करी विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. एवढ्यावरच न थांबता दर आठवड्याला त्यांनी या विषयाचा सर्वोच्च प्राधान्याने आढावा घेतला. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या वेळोवेळीच्या कारवाया, प्रबोधन व अन्य माध्यमातून केलेल्या कार्यवाहीमुळे जिल्ह्यात अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांत घट झाली.

कायद्याचा धाक, प्रबोधन व पुनर्वसन या त्रिसूत्रीने गेले पाच महिने काम केल्याने जिल्ह्यात अमली पदार्थ संबंधित घटना कमी झाल्या आहेत. याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थ कारवाया रोखण्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांच्या पत्नी/पतीच्या नावे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 25 हजार रूपयांचे धनादेश पालकमंत्री यांनी आज प्रदान सन्मानाने केले. यासाठी त्यांनी स्वतःच्या संवेदना या स्वयंसेवी संस्थेच्या फंडातून रक्कम दिली.

यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरूण पाटील आणि सचिन धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस शिपाई जावेद शेख आणि मोहसिन टीनमेकर तसेच विटा पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम माळी आणि हेमंत तांबेवाघ, पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ यांच्या पती/पत्नीच्या नावचे धनादेश संबंधितास व अनुपस्थित कर्मचाऱ्यांचे धनादेश पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.

एकूणच सज्जनांची साथ, दुर्जनांचा नाश यासाठी पालकमंत्री यांनी दिलेली ही थाप नक्कीच प्रेरणा व प्रोत्साहन देणारी ठरेल. याचबरोबर भावी पिढीला अमली पदार्थांपासून रोखण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच सामाजिक कार्य ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button