28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दि.6 : सोलापूर जिल्हयात दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सलमान आझमी यांनी केले आहे.
राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सर्व न्यायालयात करण्यात येत आहे. सदर लोकअदालतीमध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे बँक वसुली प्रकरणे, कलम ३८ एन. आय. अॅक्ट ची प्रकरणे, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, भुसंपादन बाबतची प्रकरणे तसेच बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखारत, बँक लवाद दरखास्त इत्यादी (प्रलंबित व दाखलपूर्व) प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ज्या पक्षकारांना लोकअदालतमध्ये प्रत्यक्षरीत्या सहभागी होता येणार नाही त्यांच्यासाठी आभासी पध्दतीने उपस्थित राहणेकरीता ऑनलाइन माध्यमाचा वापर केला जाणार आहे.

तसेच सदरच्या लोकन्यायालयात ई-चलनाच्या प्रकरणात एस.एम.एस. द्वारा वाहनधारकांच्या मोबाईलवर नोटीसा पाठविल्या जात आहेत. सदर चलनानुसार नोटीसमध्ये नमूद लिंकवर ऑनलाइनव्दारे चलनाची रक्कम भरता येवू शकते. तसेच महा- ट्राफिक या अॅपवरसुध्दा सदर रक्कम भरता येवू शकते. या व्यतिरीक्त महाराष्ट्रातील कोणत्याही जवळच्या वाहतूक शाखेमध्ये जावून सदर रक्कम भरता येवू शकते. धनादेश न वटलेल्या फौजदारी प्रलंबित प्रकरणांमध्ये धनादेशाची थोडी रक्कम भरुन प्रकरण निकाली काढता येणे शक्य होणार आहे. धनादेशाची रक्कम एक- रकमी देता येणे शक्य नसल्यास ठरलेल्या रक्कमेचे हप्ते बांधून घेणे शक्य होणार आहे. काही रक्कम लोकअदालती दिवशी देवून उर्वरीत रक्कमेबाबतत तडजोड हुकुमनामा करणे व संपुर्ण फौजदारी प्रकरण निकाली निघणे शक्य होणार आहे. परिणामी पक्षकारास न्यायालयात पुन्हा हजर राहण्याची आवश्यकता राहणार नाही.

सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी आपापली प्रकरणे तडजोडीने मिटवुन लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सलमान आझमी यांनी केले आहे
लोकन्यायालयाचे फायदे

  • प्रकरणाचा झटपट निकाल लागतो, तोंडी पुरावा उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात.
  • लोकन्यायालयाच्या निवाडयाविरुध्द अपील नाही. एकाच निर्णयात कोर्ट बाजीतून कायमची सुटका होते.
  • लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समझोतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार,
  • लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो.
  • परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटूताही निर्माण होत नाही.
  • न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणेच लोकन्यायालयात होणा-या निवाडयाची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते.
  • वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते.
  • लोकन्यायालयात निकाली निघणा-या प्रकरणांमध्ये कायदयानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या